पुरी इथल्या भगवान जगन्नाथ रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी.
Ekach Dheya
नवी दिल्ली : ओदिशातल्या पुरी इथल्या भगवान जगन्नाथ मंदीराच्या रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली . सरन्यायाधीश न्यायमुर्ती एस.ए.बोबडे आणि न्यायामुर्ती दिनेश महेश्वरी आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या पीठासमोर ऑनलाईन माध्यमातून सुनावणी झाली.
धार्मिक परंपरांमधल्या बारीक सारीक गोष्टीत न्यायालय लक्ष घालू शकत नाही, त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तसंच मंदीर व्यवस्थापनाने विवेकबुद्धीनं निर्णय घ्यावा असं न्यायालयानं म्हटलं आहे. या यात्रेला येणाऱ्याची संख्या अंदाजे १० लाखाच्या घरात असल्यानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने आपण या यात्रेला परवानगी देऊ शकत नाही, असं न्यायालयानं गेल्या सुनावणीच्या वेळी म्हटलं होतं.
दरम्यान ही यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी आपण केंद्र सरकार आणि मंदीर व्यवस्थापनासोबत योग्य तो समन्वय साधू असं ओदिशा सरकारनं न्यायालयाला सांगितलं. तर, राज्य सरकार आणि मंदीर व्यवस्थापानाशी संमन्वय राखत, नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता या यात्रेचं आयोजन करणं शक्य असल्याचं केंद्र सरकारनं न्यायालयाला सांगितलं आहे. दरम्यान ही सुनावणी केवळ ओदिशातल्या पुरी इथल्या रथयात्रेशीच संबंधित आहे, इतर कोणत्याही ठिकाणाशी संबंधित नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.