भायखळा पूर्व भागात उभारलेल्या ‘जम्बो फॅसिलिटी’ कोविड उपचार केंद्राची मंत्री सुनिल केदार यांनी केली पाहणी
Ekach Dheya
मुंबई : भायखळा पूर्व परिसरातील केंद्र सरकारच्या ‘रीचर्डसन आणि क्रुडास’ कंपनीच्या परिसरात महापालिकेने उभारलेल्या एक हजार ‘बेड’ क्षमतेच्या ‘जम्बो फॅसिलिटी’ कोविड उपचार केंद्रास पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी आज भेट देऊन पाहणी केली.
‘कोरोना कोविड १९’ बाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी ‘जंबो फॅसिलिटी’ अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली आहेत. याच शृंखलेत आता भायखळा पूर्व परिसरात असणाऱ्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील ‘रीचर्डसन आणि क्रुडास’ कंपनीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपातील एक मोठे उपचार केंद्र उभारण्यात येत आले आहे. यात तब्बल १ हजार खाटांची क्षमता असलेले हे उपचार केंद्र आहे, अशी माहिती श्री.केदार यांना ‘इ’ विभागाचे सहायक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी दिली.
‘कोविड १९’ बाधित रुग्णांवर उपचार करताना शरीरातील प्राणवायूच्या पातळीची अर्थात ‘ऑक्सिजन लेव्हल’ची महत्त्वाची भूमिका असते. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी असणाऱ्या १ हजार खाटांपैकी ३०० खाटा या ‘ऑक्सिजन बेड’ असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ५० डॉक्टर्स, १०० नर्सेस आणि १५० परिचर व इतर वैद्यकीय कर्मचारी; असे एकूण ३०० कर्मचारी दिवसाचे २४ तास अव्याहतपणे कार्यरत असणार आहेत. याव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका व रुग्णसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर बाबी देखील गरजेनुरूप उपलब्ध करून घेतल्या जाणार आहेत.