लग्नसमारंभ साजरा करण्यास अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Ekach Dheya
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने लग्नसमारंभ साजरा करण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.
पुणे : आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
कोविड १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली असून त्यास ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ आणि टप्पे निहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी “मिशन बिगीन अगेन” (MISSION BEGIN AGAIN) बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे.
कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन दरम्यान, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तथापि, हे लग्न समारंभ कोणकोणत्या ठिकाणी पार पाडता येतील याबाबतचा उल्लेख सदर आदेशामध्ये नाही. ५० लोकांच्या मर्यादेत घराच्या परिसरात लग्न समारंभ साजरे करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ५० लोकांच्या मर्यादेतच सोशल डिस्टसिंग पाळून खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह येथे समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्याबाबतच्या विविध मागण्या शासनाकडे प्राप्त झाल्या. या सूचना व मागणी विचारात घेता तसेच आता पावसाळा सुरु झाला असल्यामुळे खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग तसेच कोव्हीड -१९ संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास परवानगी देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शासन अधिसूचना सुधारणा पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात लागू करण्यात आल्या असून
सर्व संबंधित प्रशासकिय विभाग यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी. पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात महाराष्ट्र शासन अधिसूचनेत पुढील अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येईल.
अटी व शर्ती :
१. लग्न समारंभाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील.
२. लग्न समारंभाच्या ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास सदरील व्यक्ती दंडनीय कारवाईस पात्र राहील.
३. लग्न समारंभाच्या ठिकाणी जास्तीत जास्त ५० व्यक्ती उपस्थित राहतील व त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टेंसिंग) सहा फूट राखणे बंधनकारक राहील.
४. लग्न समारंभाच्या ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खाण्यास व मद्यपानास सक्त मनाई राहील.
५. लग्न समारंभाची जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
६. लग्न समारंभाच्या आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हात धुणे,सॅनिटायझरचा वापर या करिता संंबंधित विनावातानुकूलित मंगल कार्यालय /हॉल/खुले लॉन/सभागृह व्यवस्थापक/मालक यांच्यामार्फत व्यवस्था करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत वातानुकूलित सेवेचा (एसी) वापर करण्यात येऊ नये.
७. लग्न समारंभाच्या ठिकाणी बसण्याच्या जागा सामाजिक अंतर राहील अशा पद्धतीने खुणा (मार्किंग) करुन निश्चित करण्यात याव्यात.
८. लग्न समारंभाच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापक / मालक यांच्या मार्फत करण्यात यावी.
९. लग्न समारंभाच्या ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले तर सदर भागातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह तात्काळ बंद करण्यात येतील.
या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना विरूध्द भारतीय साथ अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, व भारतीय दंड संहिता (४५ऑफ १८६०) कलम १८८ आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.