देशात कोविड-१९ चे पावणे २ लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ५७ पूर्णांक ४३ शतांश टक्के झाला आहे. २ लाख ७१ हजार ६९७ रुग्णांनी कोविड-१९ वर यशस्वीरीत्या मात केली आहे. १ लाख ८६ हजार ५१४ रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत.
गेल्या २४ तासात कोरोना संसर्ग झालेले १६ हजार ९२२ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ७३ हजार १०५ झाली आहे. गेल्या २४ तासात ४१८ रुग्णांचा मृत्यू झाला आणि या आजाराने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४ हजार ८९४ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीत म्हटलंय की एकूण रुग्णांपैकी ६९ टक्के रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, गुजरात आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमधेच आहेत. दरम्यान भारतीय वैद्यक संशोधन संस्थेने गेल्या २४ तासात २ लाख ७ हजार ८७१ स्वॅब नमुने तपासले असून आतापर्यंत ७५ लाख ६० हजार ७८२ तपासण्या झाल्या आहेत.
तपासणीची सुविधा सातत्याने वाढवली जात असून आता देशभरातल्या १ हजार ७ प्रयोगशाळांमधे ही सुविधा उपलब्ध आहे. यातल्या ७३४ प्रयोगशाळा सरकारी आणि २७३ खासगी आहेत.