Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यकारभार आजही मार्गदर्शक- मुख्यमंत्री

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

मुंबई : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिवछत्रपतींचा वसा आणि वारसा सांभाळत सुराज्य आणि सुशासन आणले. त्यांचा राज्यकारभार आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत मार्गदर्शक असा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी अभिवादन केले आहे. तसेच सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या सुखासाठी कल्याणकारी स्वराज्याची पायाभरणी केली. शिवछत्रपतींचा हा वसा आणि वारसा राजर्षी शाहूंनी समर्थपणे पुढे नेत सुराज्य आणि सुशासन आणले. समाज परिवर्तनाच्या पुरोगामी चळवळींना बळ देतानाच शिक्षण, आरोग्य, औद्योगिक, सहकार, कृषी, सिंचन अशा क्षेत्रांनाही त्यांनी पाठबळ दिले. महिला सबलीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मोठ्या अशा वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे त्यांचे आरक्षणाचे धोरण आज जगाच्या अभ्यासाचा विषय ठरला आहे. राजर्षी शाहूंनी राज्यकारभार सदैव  लोकाभिमुख असाच केला. समता, बंधुता आणि सार्वभौमत्व या लोकशाही मूल्यांबाबत ते आग्रही होते. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत लोकराजा शाहूंचा राज्यकारभार मार्गदर्शक असा आहे. त्यानुसार वाटचाल करणे,हेच त्यांना जयंतीदिनी अभिवादन ठरेल. राजर्षी शाहूंना त्रिवार अभिवादन आणि त्यांना मानाचा मुजरा.

Exit mobile version