Site icon साप्ताहिक एकच ध्येय

गलवान खोऱ्यातला तणाव हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याचं राजकारण करू नये – शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेला तणाव हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याचं राजकारण करू नये, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे.

१९६२ च्या युद्धानंतर चीननं भारताचा ४५ हजार चौरस किलोमीटरचा भूभाग बळकावला होता हेही आपण विसरता कामा नये, असंही पवार यांनी म्हटलं आहे. ते आज सातारा इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.

हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. गलवान खोऱ्यात चीननं भारताची कुरापत काढली आहे, संपर्काच्या दृष्टीनं आपण तिथं आपल्या हद्दीतल्या परिसरात रस्ता बांधत असताना, चीनी सैन्यांनी भारतीय सैनिकांची कुरापत काढली आणि झटापट झाली. त्यात आपले २० जवान शहीद झाले. आपण गस्त घालत होतो आणि सतर्क होतो म्हणूनच झटापट झाली. असं नसतं तर आपल्याला चीनचे सैनिक येऊन गेल्याचं कळलंच नसतं, त्यामुळे हे संरक्षण मंत्रालयाचं अपयश आहे असं म्हणता येणार नाही असंही पवार यांनी म्हटलं आहे.

सध्या रोजच पेट्रोलचे दर वाढत चालले असून आजवरच्या इतिहासात असं कधी झालं नव्हतं. मात्र, लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या सहनशीलतेचा गैरफायदा केंद्र सरकार घेत असल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे.

आमदार पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याविषयीच्या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले की, या आधीच्या अनेक निवडणुकांमधे मतदारांनी त्यांना नाकारलेलं आहे, अशा व्यक्तींची दखल घेणं गरजेचं वाटत नाही.

तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केलेला दाव्याबाबत उत्तर देताना ते म्हणाले की, फडनवीस यांच्याकडे सध्या पुष्कळ वेळ आहे, त्यामुळे केवळ ते प्रसिद्धीसाठी ते अशा अनेक गोष्टी करत आहेत.

Exit mobile version