Site icon साप्ताहिक एकच ध्येय

संस्थात्मक अलगीकरणावर भर देण्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

सोलापूर शहरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा

गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती

सोलापूर : शहरात काटेकोर सर्वेक्षण करुन कोरोनाची लागण झाल्याची शंका असणाऱ्या आणि कोमॉर्बिड नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिल्या.

सोलापूर शहरातील कोरोना प्रसार थांबविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत श्री.टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.  गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री तथा राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, यशवंत माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ उपस्थित होते.

श्री.राजेश टोपे यांनी सांगितले की, नागपूर, मालेगाव, धारावी येथे संस्थात्मक अलगीकरण केल्यामुळेच तेथील कोरोना प्रसाराचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे सोलापूर शहरातील दाट वस्ती असलेल्या भागातील सर्व्हेक्षण करा, सर्व्हेक्षणात संशयित वाटणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करा. इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये त्या नागरिकांना चांगला आहार द्या. तेथील वातावरण प्रसन्न ठेवा, त्यांचे समुपदेशन करा.

सर्व्हेसाठी आवश्यक असणारी साधन समग्री तत्काळ द्या. प्रत्येक आशा वर्करला पल्स ऑक्सिमीटर द्या.  पल्स ऑक्सिमीटरचा प्रभावीपणे वापर करा.  सर्व्हेक्षण करताना पोलीसांची मदत घ्या. रेशनकार्ड मतदार यादी यांच्या डाटावरुन पन्नास वर्षावरील लोकांना ओळखून त्यांच्या चाचण्या घ्या यासाठी मोबाईल एक्सरे टेलीरेडिओलॉजी तंत्रज्ञानाचा वापर करा.  मुंबईतील टास्क फोर्सशी चर्चा करा, अशा सूचना श्री.टोपे यांनी दिल्या.

महानगरपालिकेला आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ यांची उपलब्धता  करुन दिली जाईल. मात्र क्वारंटाईन सेंटरची संख्या वाढवा त्याचबरोबर कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर आणि कोव्हीड हॉस्पिटल यांची क्षमता वाढवा, अशा सूचना श्री.टोपे यांनी दिल्या.  पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या एलिझाबेस्ड ॲन्टीबॉडी टेस्ट करुन घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

कोरोनाचे अहवाल तयार करताना त्याचे रिपोर्टींग करताना योग्य काळजी घ्यावी.  रिपोर्टीग अचूक होण्यासाठी नियमावलीचे काटेकोर पालन करा. असे श्री.टोपे यांनी सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस यांनी कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांच्या हालचाली नियंत्रित राहतील यावर लक्ष द्यावे. पोलीस कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी. ५५ वर्षावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यालयीन काम देण्याच्या सूचना दिल्या.

Exit mobile version