कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अनिर्बंध वावर रोखणे गरजेचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Ekach Dheya
पावसाळा, कोरोना तसेच मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांचा मुख्यमंत्र्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा
मुंबई : कोरोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात लोक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. हे अजिबात अपेक्षित नाही. यामुळे कोरोनाची साथ जी आपण आटोक्यात ठेवली आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढून आपल्यासमोर आव्हान उभे राहील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांनी २ किमी अंतराचे निर्बंध टाकले त्यामागे मुक्त आणि अनावश्यक वावराला रोखणे हाच उद्देश आहे असे स्पष्ट केले. पावसाळा, कोरोना तसेच मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांवर आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत ते बोलत होते.
खासदार अनिल देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू यांनीही या बैठकीत सहभाग घेऊन सूचना केल्या. बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीए आयुक्त आर राजीव, बृहन्मुंबई पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते.
आपण अनलॉकमधील नियमांनुसार कार्यालयांमध्ये जात असाल, दवाखाने किंवा इतर आवश्यक कारणांसाठी जाणे गरजेचे असेल तर तुम्हाला कुणी अडवणार नाही पण कोणतेही कारण नसताना फिरायला गेल्यासारखे बाहेर पडत असाल, वाहनांची गर्दी होणार असेल तर तुम्ही स्वत:चा आणि इतरांचाही धोका वाढवित आहात हे लक्षात ठेवा. तुमच्या घराच्या आसपासच्या भागामध्ये किराणा, अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तू, औषधी, भाजीपाला हे सर्व काही मिळू शकते अशी परिस्थिती आज मुंबईत आहे. तुम्हाला सकाळी, संध्याकाळी उद्याने , मैदाने यांमध्ये जायचे आहे तर नजीकच्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. आता तर आपण अनेक व्यवहार खुले केले आहेत, त्यामुळे नागरिक म्हणून जबाबदारीने वागणे पण गरजेचे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
साफसफाईत समन्वय ठेवा
मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांनी समन्वयाने या पावसाळ्यात कुठेही पाणी साचून नागरिकांचे हाल होणार नाहीत असे पाहावे तसेच नाले स्वच्छता, साफसफाई करताना लोकप्रतिनिधी तसेच इतर सर्वांच्या संपर्कात राहून तातडीने कामे पूर्ण करावीत असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पावसाळ्यामध्ये मेट्रोच्या कामांमुळे तयार झालेल्या खड्ड्यांत पाणी साचण्याचा आणि पर्यायाने दुर्घटना घडणे, रोगराई वाढण्याचा संभव असल्याने सर्व प्राधिकरणांनी एकत्र येऊन ही कामे पूर्ण करावीत असेही ते म्हणाले.
मेट्रो व इतर पायाभूत सुविधा कामे आज ज्या ठिकाणी कामगारांअभावी खोळंबली आहेत तिथे तातडीने स्थानिक व्यक्तींना रोजगार देऊन ती सुरु करा, अर्धवट बांधकामे झाली आहेत तिथला कचरा, साहित्यांचे ढीग हे बाजूला करणे नितांत गरजेचे आहे. अजून पावसाला वेग आलेला नाही शक्य तेवढी ही कामे हातावेगळी करा असेही मुख्यमंत्री म्हणाले. रेल्वे, बीपीटी, विमानतळ प्राधिकरण यासर्वांचा एकमेकांत समन्वय हवा असेही ते म्हणाले.
मुख्य सचिव म्हणाले, येणाऱ्या पावसाळ्यात आपल्याला साठीच्या इतर रोगांचा ही मुकाबला कोरोनाशी करावा लागणार असल्याने सर्वांनीच काळजी घेणे व सावध राहणे गरजेचे आहे. पावसाळ्यात पंप्स सुरु आहेत किंवा नाहीत, त्यांना डिझेल आहे का? अशा छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता पालिका अधिकाऱ्यांनी करावी. रुग्णालयांतील ८० टक्के बेड्स आपण ताब्यात घेतले असून रुग्णालय नियमांचे पालन करीत आहे किंवा नाही याकडे लक्ष ठेवले जाते. प्रत्येक रुग्णालयास उपचाराचे दर रुग्णालयाबाहेर फलकांवर लावणे आवश्यक केले असून तसे न केल्यास कडक कारवाई केली जाईल असेही मुख्य सचिव म्हणाले. आर. राजीव यांनी यावेळी सांगितले की, ठिकठिकाणी मेट्रोचे नियंत्रण कक्ष असून अधिकारी व अभियंते हे २४ तास त्याठिकाणी उपलब्ध असतात त्यामुळे कुठल्याही बाबतीत त्यांचे लक्ष लगेच वेधता येते.
जे परराज्यातील मजूर परत राज्यात परतत आहेत त्यांची कोविड चाचणी व्हायला पाहिजे. मेट्रो मार्गावर कामांसाठी जे कमी तीव्रतेचे स्फोट केले जात आहेत त्यामुळे काही ठिकाणी आजूबाजूच्या इमारतींना तडे गेले आहेत.मुंबई पालिकेने व एमएमआरडीएने मिळून या इमारतींचे बांधकामांचे बांधकाम ऑडिट करावे,स्थानिकांना कामांमध्ये प्राधान्य द्यावे अशा मुद्य्यांवर देखील बैठकीत चर्चा झाली.