‘कोरोना’शी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
Ekach Dheya
बारामती : ‘कोरोना’च्या रुग्णांसह इतर आजारांच्या रुग्णांनाही तातडीने उपचार मिळण्याची काळजी घ्यावी. ‘कोरोना’च्या संकटाशी सामना करताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
‘कोरोना विषाणू प्रार्दुभाव निर्मुलन आढावा’ आणि ‘विविध विकास कामांची आढावा’ बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली. यावेळी नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर , नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडूसकर, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने दक्ष राहून काम करावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही आणि सामाजिक अंतर राखले जाईल याकडे विशेष लक्ष द्यावे. रूग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणीची प्रक्रीया वाढवावी. कोव्हीड आणि नॉन कोव्हीड रूग्ण या दोघांनाही वेळेत उपचार मिळणे आवश्यक असल्याने आरोग्य विभागाने याची खबरदारी घ्यावी. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असेही, आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच कोव्हीडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्रीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले विकासाची कामे ही दर्जेदार व वेळेतच झाली पाहीजेत. जरी ‘कोरोना’चे संकट असले तरी त्याचा परिणाम विकास कामांवर होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखत काम करावे. जेथे अतिक्रमण असेल ते योग्य ती कार्यवाही करून काढून टाकण्यात यावे. परंतु सदर ठिकाणी असलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ न देता त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.