शिवभोजन योजना ठरतेय गरीबांसाठी वरदान- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : गोर-गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजना सुरू असून २६ जानेवारीपासून आजपर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचा गरजूंनी लाभ घेतला आहे. या थाळीने राज्यातील गरीब, गरजूंना मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत ८४८ केंद्रे कार्यरत असून योजनेचा विस्तार करून ही योजना तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे.
महिनानिहाय थाळ्यांचे वितरण
१. जानेवारी- ७९ हजार ९१८
२. फेब्रुवारी – ४ लाख ६७ हजार ८६९
३. मार्च – ५ लाख ७८ हजार ०३१
४. एप्रिल – २४ लाख ९९ हजार २५७
५. मे – ३३ लाख ८४ हजार ०४०
६. जून- (२९ जूनपर्यंत) २९ लाख ९१ हजार ७५५
शिवभोजन थाळ्यांचे वितरण राज्यात झाले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात ५ रुपये थाळीप्रमाणे योजनेतून जेवण उपलब्ध करून दिल्याने काम करणारे मजूर, स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसेच बाहेर गावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने आधार देण्याचे आणि भूक भागवण्याचे काम केले.
यंत्रणेचे कौतुक
या अडचणीच्या काळात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अतिशय सुयोग्य पद्धतीने योजनेचे सनियंत्रण आणि व्यवस्थापन केल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विभागाच्या सर्व कर्मचारी-अधिकारी वर्गाचे, शिवभोजन केंद्राच्या चालकांचे कौतुक केले आहे.
केंद्राची स्वच्छता
शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.