राज्यभरातून विविध पालख्या एसटीने पंढरपुराकडे रवाना
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं आज दुपारी पंढरीकडे प्रस्थान झालं. आळंदीत आज सकाळपासून माऊलींचे नित्योपचार आणि दुपारचा नैवेद्य झाल्यानंतर दुपारी दीड च्या सुमाराला पादुकांचा पंढरीच्या दिशेनं प्रवास सुरु झाला.
हार फुलांनी सुशोभित अशा विशेष बसमधून या पादुका पंढरपूरला रवाना झाल्या असून सोबत २० जणांना जाण्याची परवानगी दिली आहे. माउलींना वेशीपर्यंत निरोप देण्यासाठी आळंदीकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती.
आळंदीहून निघाल्यानंतर मात्र या पादुका थेट पंढरपूरकडे जाणार असून वाटेत कुठंही न थांबण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या गेल्या आहेत. वाटेत ठिकठिकाणी माउलींच्या पादुकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. देहूत आज परंपरेप्रमाणे भजन आणि कीर्तन तसेच पूजा संपन्न झाल्यानंतर पादुकांचं, फुलांनी सजवलेल्या विशेष बसमधून निवडक वारकरी आणि पदाधिकाऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान झालं. मार्गावर इनामदार वाडा, अनगडशहा बाबा दर्गा, चिंचोलीतलं शनी मंदिर आणि रोटी घाट इथं पादुका बस बाहेर न काढता जागीच आरत्या करून पादुका आज संध्याकाळी पंढरपूरला पोचतील.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पायी पालखी न्यायला परवानगी नसल्यानं संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज सकाळी त्र्यंबकेश्वरहून शिवशाही बसनं पंढरपूरकडे रवाना झाली. टाळ मृदूंगाच्या तालात हरीनाम घेत वीस वारकरी आणि निवृत्तीनाथ महाराज देवस्थानचे विश्वस्त, या बसनं निघालेल्या वारीत सहभागी झाले आहेत. या बसमध्ये वैद्यकिय पथकही आहे.
अमरावती जिल्ह्यात कौंडण्यपुरातल्या रुक्मिणीमातेची पालखीही आज एसटी बसनं पंढरपूरला रवाना झाली. सकाळी महिला आणि बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते विधीवत पूजन केल्यानंतर पालखी रवाना झाली. यंदा कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन दक्षका म्हणून फक्त २० वारकरी पालखीसोबत गेले आहेत.