Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कृषी संजीवनी सप्ताहाचा महसूलमंत्र्यांकडून ऑनलाईन शुभारंभ

‘कृषी संजीवनी सप्ताहाच्या’ माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञान शेतकरी बांधवांना मिळण्यास मदत होईल – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई : महाराष्ट्राचा शेतकरी सक्षम आणि स्वयंपूर्ण झाला पाहिजे असे स्वप्न महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी पाहिले होते. आजच्या काळात आपला शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे आवश्यक असून त्यासाठी शेतकऱ्याला अद्ययावत कृषी तंत्रज्ञान मिळणे गरजेचे आहे. हे अद्ययावत कृषी तंत्रज्ञान ‘कृषी संजीवनी सप्ताह’च्या माध्यमातून मिळण्यास मदत होईल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

महसूलमंत्री थोरात यांनी हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. तसेच कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनाचे औचित्य साधून खांडगाव (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) येथे आयोजित कृषी संजीवनी सप्ताहाचा आज ऑनलाईनरित्या शुभारंभ केला.

श्री. थोरात म्हणाले की, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी काम केले. शेती, जलसंधारण क्षेत्रात त्यांनी आमूलाग्र बदल केले. नवीन बी-बियाणे, शेतीसाठी खतांची, पाण्याची उपलब्धता यासाठी काम करताना राज्य अन्नधान्यात स्वयंपूर्ण कसे होईल यासाठी प्रयत्न केले.

पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ तसेच अद्ययावत कृषी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत  पोहोचविण्याचा उपक्रम कृषी संजीवनी सप्ताहाद्वारे राबवला जात आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन मंत्री संदिपन भुमरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात कृषी संजीवनी सप्ताह आयोजित करण्यात येत असून त्याचा फायदा राज्यातील सर्वदूर शेतकऱ्यांना होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Exit mobile version