येत्या ३ वर्षात धावू लागणार खाजगी कंपन्यांनी चालवलेल्या रेल्वेगाड्या
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगी कंपन्यांनी चालविलेल्या रेल्वे येत्या ३ वर्षात प्रत्यक्षात धावू लागतील. त्यांचे भाडे त्या मार्गावर चालणाऱ्या विमान सेवेच्या दराप्रमाणे असेल, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केलं आहे.
सध्या सुरू असणाऱ्या सुमारे २ हजार ८०० मेल-एक्स्प्रेस गाड्यांपैकी सुरुवातीला ५ टक्के गाड्या खासगी कंपन्या चालवतील. प्रवाशांच्या गरजेप्रमाणे या गाड्या उपलब्ध होणार असल्यानं विलंब यादी कमी होईल, असंही ते म्हणाले.
रेल्वेच्या पायाभूत सुविधा वापरण्यासाठी या खासगी कंपन्या रेल्वेला निश्चित शुल्क देतील. याशिवाय जमा झालेल्या महसुलातूनही काही उत्पन्नाचा हिस्सा या कंपन्या रेल्वेला देतील. त्यासाठी निवीदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचं रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितलं. रेल्वेने यासाठी अर्हता पत्र मागविल्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निर्णयावर टीका केली आहे. गरीबांची जीवनवाहिनी सरकार हिरावून घेत असल्याचं ते म्हणाले.