पुणे जिल्ह्यासाठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करा- उपमुख्यमंत्री अजित पवार
Ekach Dheya
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोराना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध राबवा त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर,जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड चे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शासनाचे वैद्यकीय सल्लागार, संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून चे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोविड रुग्णांवर उपचार करतांना नॉन कोविड रुग्णाकडे दुर्लक्ष होता कामा नये, काही रुग्णालयामध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करा, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यांनतर शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात ये-जा करत असल्यामुळे या भागात कोरोनाचा प्रसार होतांना दिसून येत आहे. ग्रामीण भागात विविध समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने कोरोना विषाणूच्या संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईल, यासाठी योजना तयार करा. शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.
सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढतांना दिसून येत आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या करीता आवश्यक ती कार्यवाही करावी. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत.त्यामुळे कारखान्यातील कामगारांची गैरसोय होवू नये यासाठी कारखान्याच्या मालकानी कामगाराची राहण्याची करावी. तसेच काम करीत असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार कामगारांना मास्क वापरण्यास, हात वारंवार धुण्यास आणि शारिरीक अंतर पाळण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमूणक करतांना परिस्थितीनिहाय कामकाजाचे सूक्ष्म वाटप करा. ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती आटोक्यात आण्यासासाठी कम्युनिटी लिडर्सची मदत घ्या. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील कोरोनाविषयक भीती घालविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या, या गोष्टी करतांना प्रतिबंधित क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करा, कोरोना बाधित रुग्ण तात्काळ शोधण्यासाठी आरोग्य पहाण्यांचे चाचण्यांचे प्रमाण वाढवा, त्यांचे तपासणी अहवाल लवकरात लवकर प्राप्त करा, जेणेकरुन सामूहिक संसर्ग पसरणार नाही. एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची तात्काळ तपासणी करा, कोरोना बाधित रुग्णावर तात्काळ वर्गवारीनुसार उपचार सुरु करा, आरोग्य सेतू ॲप मधील माहितीचा प्रभावीपणे वापर करा, यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राची मदत घ्या. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊन कालावधीत शासनाच्या निर्देशाची कडक अमंलबजावणी करा, अशा स्वरुपाचा सर्वंकष कृती आराखडा तयार करा, अशा महत्त्वपूर्ण सूचना मेहता यांनी केल्या.
कोरोना विषाणूविषयक नमुना चाचण्या वेळेत होत आहे किंवा कसे ? याकरीता एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचनाही मेहता यांनी केली. बैठकीच्या प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्याची कोरोना बाबतची सद्यस्थिती सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यामध्ये बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, आरोग्य सर्व्हेक्षण, मास्क, पीपीई कीट, आयसीयू, ऑक्सीजनयुक्त खाटा आणि श्वसनयंत्रे ( व्हेटिंलेटर) इत्यादी विषयी माहिती दिली.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आतापर्यंतचे बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, नमुना चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा या बाबतची माहिती दिली. कोरोना बाधित रुग्णांचे निदान करण्यासाठी अँटीजेन टेस्ट कीटचा वापर करण्यास सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या व भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच सहव्याधी (कोमॉर्बीड) नागरिकांचे सर्व्हेक्षण, घेण्यात येणारी दक्षता, प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना आदींची माहिती दिली. जिल्हा परिषदेमार्फत कॉल सेंटर सुरु करण्यात आले असून त्याद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या वतीने घेण्यात आलेले निर्णय कळविण्यात येतात. त्याची अंमलबजावणी आपापल्या भागात होत आहे किंवा कसे याबाबत माहिती घेण्यात येते, असे सांगितले.
पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड व पिंपरी चिंचवड चे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांच्या-त्यांच्या महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टिने करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.