Site icon साप्ताहिक एकच ध्येय

तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी 13 कोटी – उपमुख्‍यमंत्री पवार

पुणे : पाचगाव पर्वती येथील तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी 13 कोटी रुपये उपलब्‍ध करुन दिले जातील, अशी माहिती उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात तळजाई वन उद्यान विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा करण्यात आली. यावेळी त्‍यांनी ही माहिती दिली.

यावेळी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अगरवाल, उपवन संरक्षक श्रीलक्ष्‍मी, नगरसेवक सर्वश्री आबा बागूल, आश्विनी कदम, सुभाष जगताप, माजी नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्‍ह्याच्‍या विकास कामांसाठी कोणतीही आडकाठी आणली जाणार नाही, असे स्‍पष्‍ट करुन उपमुख्‍यमंत्री पवार म्‍हणाले, पुणे शहराच्‍या दृष्टिने चांगल्‍या गोष्‍टी व्‍हाव्‍यात, या मताचा मी आहे. पाचगाव पर्वती या वनक्षेत्राचा निसर्ग पर्यटन आराखडा तयार करुन त्‍यास नागपूर येथील महाराष्‍ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची मंजुरी घेण्‍यात आलेली आहे. या आराखड्यासाठी राज्‍य शासनाच्‍यावतीने 13 कोटी रुपये उपलबध करुन दिले जातील.

यानंतर बैठकीत सेनापती बापट रोड ते पंचवटी पर्यायी रस्‍ता, मॉडर्न कॉलेज येथील पर्यायी रस्‍त्‍याबाबतही चर्चा झाली. यावेळी आमदार सिध्‍दार्थ शिरोळे, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पुणे प्रदेश विकास प्राधीकरणाचे महानगर आयुक्‍त विक्रमकुमार, अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अगरवाल, उपवन संरक्षक श्रीलक्ष्‍मी, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.

Exit mobile version