Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विस्थापित मजूर व शिधापत्रिका नसलेल्यांना मोफत तांदूळ व अख्खा चना वाटप करण्यास १० जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : विस्थापित मजूर व शिधापत्रिका नसलेल्यांना मोफत तांदूळ व अख्खा चना  वाटप करण्यास १०  जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी दिली.

केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या आणि  शिधापत्रिका नसलेल्यांना मे व जून या दोन महिन्याच्या कालावधीकरीता प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ वितरित करण्यात येत आहेत, त्याकरिता पात्र लाभार्थ्यांचे निकष ठरवून देण्यात आलेले आहेत. त्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमधील शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे, परंतु अद्यापपर्यंत शिधापत्रिका प्राप्त न झालेल्या व्यक्ती, अन्न धान्याची गरज असलेले सामाजिक व आर्थिकदृष्टया दुर्बल विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर, तसेच शासनाच्या दिनांक २४ एप्रिलच्या पत्रान्वये प्रलंबित असलेले सर्व शिधापत्रिकाधारक आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच इतर राज्य योजनेतील शिधापत्रिकाधारक यातून पूर्णपणे वगळण्यात येतील आदी निकषांचा समावेश आहे. या निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांच्या याद्या महानगरपालिका व कामगार विभागाच्या मदतीने तयार करून घेण्यात आल्या आहेत.

मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील उपरोक्त निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना संबंधित विभागाच्या शिधावाटप अधिकारी यांचे कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आलेल्या केंद्रामधून मे महिन्याकरिता प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत तांदळाचे वितरण दिनांक 29 मे पासून सुरू करण्यात आले आहे. तर जूनकरिता  सदर योजनेअंतर्गत मोफत तांदळाचे वितरण सुरू आहे. आतापर्यंत  १०५८ मे.टन मोफत तांदळाचे वितरण करण्यात आलेले आहे.

सदर योजनेअंतर्गत मे आणि जून या महिन्याकरीता प्रतिकुटुंब प्रतिमाह एक किलो मोफत अख्खा चण्याचे वाटप सुरू आहे. सदर योजनेतील लाभार्थ्यांना मे व जून या दोन महिन्याच्या मोफत तांदळाचे व मोफत अख्खा चण्याचे वितरण करण्यास दिनांक १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रामधून कोणतीही गर्दी न करता योजनेतील धान्य सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून तसेच मास्कचा वापर करून लवकरात लवकर धान्य प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version