पुणे : शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक असणारी पीएमपी बससेवा अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या मात्र याच सेवेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ई-बसेसबाबत शहराव्यतिरिक्त अन्य ठिकाणी चर्चा होत असून विविध शिष्टमंडळे पीएमपीच्या भेटीला येत आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या सुमारे दोन हजार बसेस धावतात. यापैकी 25 ई-बसेस आहेत. केंद्र शासनाच्या धोरणानुसार येत्या काळात इलक्ट्रिक वाहनांवर भर देण्यात येत आहे. या धोरणानुसार सुरुवातीला काही प्रमुख शहरांमध्ये ई-बससेवा सुरू केली जाणार होती. यामध्ये पुणे शहराचा समावेश आहे. सध्या शहरामध्ये सर्वाधिक अर्थात 25 ई-बसेस विनातक्रार धावत आहेत.
त्यामुळे येत्या काळामध्ये ज्या शहरांमध्ये बससेवा सुरू होणार आहे, अशा शहरांतील शिष्टमंडळांनी पीएमपीएमएलला भेट दिली. बसेसची देखभाल-दुरुस्ती, संचलन आदींसह तांत्रिक बाबींसंदर्भात माहिती घेण्यासाठी या भेटी घेण्यात येत आहेत.
आंध्र प्रदेशातील काही अधिकाऱ्यांनी पीएमपीला नुकतीच भेट दिली. यांसह अहमदाबाद, कोल्हापूर, नाशिक, सोलापूरसह विविध शहरांतील अधिकाऱ्यांनी देखील पीएमपीची भेट घेतली आहे. तर परदेशातून देखील “ऑनलाइन कॉन्फरन्स’च्या माध्यमातून माहिती घेण्यात आली. यामुळे पुण्याची ई-बस राज्यासह परराज्यांसाठी मार्गदर्शन ठरत असल्याचे चित्र दिसत आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.