नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बौद्ध धर्माची स्थापना झालेला देश असल्याचा भारताला अभिमान आहे. भारतातूनच इतर देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला. भगवान बुद्धांनी आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखविला आणि संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केलं. धर्मचक्र दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते. आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेनं या समारंभाचं आयोजन केलं आहे.
अडीच हजार वर्षांपूर्वी आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी पहिल्यांदा आपल्या शिष्यांना उपदेश केला होता. त्याच्या स्मृत्यर्थ आषाढ पौर्णिमा धर्मचक्र दिन म्हणून साजरी केली जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. जग सध्या अकल्पित आव्हानांचा सामना करत आहे. अशा वेळी भगवान बुद्धांच्या उपदेशातून या समस्येवर उत्तर मिळू शकेल. ही शिकवण कालातीत आहे. भविष्यातही जगाच्या शाश्वततेसाठी भगवान बुद्धांची शिकवण हा योग्य मार्ग आहे असं पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले. आजचा दिवस हा आपल्या गुरूंचं स्मरण करण्याचा दिवस आहे याची आठवण मोदी यांनी करुन दिली.
या प्रसंगी मंगोलियाच्या राष्ट्रपतींचा संदेशही वाचण्यात आला.