नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत शहर आणि उपनगरात आज सकाळपासूनच पावसानं पुन्हां जोर धरला असून शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलं आहे. गेल्या 24 तासात कुलाबा इथं 129 पूर्णांक 6 दशांश मिमी. तर सांताक्रुझमधे 200 पूर्णांक 8 दशांश मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच आज दुपारी समुद्रात सुमारे साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असून मुंबईकरांनी चौपाट्यांवर जाऊ नये, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.
नवी मुंबईत काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसाचा जोर सकाळी कमी झाला आहे. गेल्या चार तासांत ५४.२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरातल्या सखल भागात पाणी साचले आहे. वाशी सेक्टर १आणि ऐरोली इथं पाणी साचलं आहे. पावसामुळे ६ झाडं उन्मळून पडली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या पावसानं आज सकाळपासून विश्रांती घेतली आहे. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात १०६ पूर्णांक ८२ मिलिमीटर सरासरी पाऊस पडला.
वाशिम जिल्ह्यात २२ जूनपासून पावसानं हजेरी लावली असून कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम तालुक्यातल्या ५०० एकरपेक्षा जास्त जमिनीचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचं काम पूर्ण झालं असून मंडळ अधिका-यांनी काल याबाबतचा अहवाल तयार केला आहे
पालघर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत संपलेल्या २४ तासांत सरासरी ९३ पूर्णांकाहून जास्त पावसाची नोंद झाली.
अहमदनगर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे मात्र पाऊस नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात आज पाऊस ओसरला असून वाशिष्ठी आणि शीव या नद्यांचा पूर ओसरल्यानं चिपळूण शहराच्या काही भागांत भरलेलं पाणी ओसरलं आहे. तसंच अर्जुना नदीचा पूर ओसरल्यानं राजापूरमधल्या मध्यवर्ती जवाहर चौकात भरलेलं पाणीही कमी झालं आहे.