मुंबई : अमेरिकेतील क्रूड इन्व्हेंटरीची पातळी घसरल्याने तसेच ओपेक देशांनी तीव्र उत्पादन कपातीचा निर्णय घेतल्याने मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या (डब्ल्यूटीआय क्रूड) किंमती ६ टक्क्यांनी वाढल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे रिसर्च एव्हीपी श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, अमेरिकी क्रूड इन्व्हेंटरीची पातळी मागील आठवड्यात २६ जून २०२० रोजी ७.२ दशलक्ष युनिट्सनी वाढलेली दिसून आली. तथापि, कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत निरंतर वाढ होत असल्याने तसेच लिबियातील तेलाचे उत्पादन पुन्हा सुरू होण्याची शक्यता असल्याने तेलाच्या दरातील वाढ मर्यादित राहिली. जगातील अनेक भागात हवाई वाहतुकीवर कठोर निर्बंध असल्यामुळेही हे परिणाम दिसून आले.
महामारीभोवतीची अनिश्चितता वाढल्याने अर्थव्यवस्था सुधारणेचा काळही लांबाला. या चिंतेमुळे सोन्याच्या दरात ०.२ टक्के इतकी वाढ झाली होती. या घटनांमुळे सुरक्षित मालमत्तेकडे धाव घेण्याचा कल दिसून आला. तथापि, जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांनी व्यावसायिक कामकाजात सुधारणा तसेच उद्योग पुन्हा सुरू झाल्याचा सकारात्मक आर्थिक आकडा दर्शवल्याने पिवळ्या धातूतील किंमतीत आणखी वाढीला मर्यादा आल्या.
धातूच्या समुहात मागील आठवड्यात निकेल हा धातू सर्वाधिक नफा कमावणारा ठरला. लंडन मेटल एक्सचेंजवरील बेस मेटलचे दर संमिश्र दिसून आले. अमेरिका आणि चीनने औद्योगिक कामकाज सुरू केल्याने जून महिन्यात बेस मेटलची मागणी वाढली आणि त्याच्या किंमतीतही वाढ झाली.
चिली आणि पेरुतील खाणींमधून कॉपरच्या पुरवठ्यावर मोठा ताण दिसून आला. तसेच धातूचा मोठा ग्राहक असलेल्या चीनकडून मागणी वाढल्यामुळे एलएमई कॉपरचे दर १.० टक्क्यांनी वाढले.