Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा जिल्हाधिकारी राम यांचा इशारा

पुणे : शासनाने लॉकडाऊन शिथील केला आहे. मात्र, अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर तसेच ग्रामीण भागात अनेक नागरीक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या वीस दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ झाली. शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील कुठल्याही गावात 5 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळले तर संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच जनजागृतीवर भर दिला जाणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, ग्रामीण भागात नागरीकांकडून मास्कचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच लग्नसमारंभात दिलेल्या नियमांचे पालन न करता गर्दी होताना दिसून येत आहे. त्यादृष्टीने भरारी पथके तयार करण्यात आली असून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version