नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योग गुरु रामदेव बाबा यांनी विकसित केलेल्या कोरोनील या औषधानं कोरोना बरा होतो अशी जाहिरात केली, तर फसवी जाहिरात केल्याच्या आरोपावरून अन्न आणि औषध प्रशासन योग्य ती कारवाई करेल, असा इशारा सरकारनं दिला आहे.
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिगणे यांनी बुलडाणा इथं आज ही माहिती दिली. बुलडाणा जिल्ह्यातल्या कोरोना प्रादुर्भावाचा त्यांनी आज आढावा घेतला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
यासंदर्भात, या औषधाचे घटक आपल्या अन्न आणि औषध विभागानं तपासले आहेत. केंद्रीय आयुष मंत्रालयानं दिलेल्या निर्देशानुसार, शक्तिवर्धक किंवा रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे घटक यामध्ये आहेत, मात्र या औषधामुळे, कोरोना बरा होत नाही, असं ते म्हणाले. हे औषध राज्यात विकावं, पण या औषधामुळे कोरोना पूर्णपणे बरा होतो अशी जाहिरात करू नये, असं शिंगणे यांनी सांगितलं.