राजगृह म्हणजे आमची अस्मिता, ‘त्या’ माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करा – धनंजय मुंडेंची गृहमंत्र्यांकडे मागणी
Ekach Dheya
मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृह या वास्तूमध्ये अज्ञात माथेफिरुकडून झालेल्या तोडफोडीचा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून, संबंधितांचा तातडीने शोध घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
मंगळवारी (दि. ०७) सायंकाळी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान तथा आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान समजल्या जाणाऱ्या ‘राजगृह’ या वास्तूमध्ये अज्ञात माथेफिरूनी प्रवेश करत तेथील कुंड्या व सीसीटीव्ही कॅमेरे आदींची तोडफोड केली, या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून पोलीस संबंधितांचा कसून तपास घेत आहेत.
दरम्यान रात्री राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी ट्विट करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान ‘राजगृह’ ही आमची अस्मिता आहे, माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला असून, या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरुना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी.’ असे श्री. मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील याप्रकरणी पोलीस तत्परतेने तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.