Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कार्यस्थळ सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता विधेयक 2019 लोकसभेत सादर

नवी दिल्ली : केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत कार्यस्थळ सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती विधेयक 2019 सादर केले. कारखान्यात कामाच्या ठिकाणची सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची स्थिती याविषयी असलेल्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी हे विधेयक तयार केले आहे.विविध कामगार संघटना, कारखान्यांचे मालक आणि इतर सर्व संबंधितांशी व्यापक चर्चा करून हे विधेयक तयार केले असल्याचे गंगवार यांनी सांगितले आहे.

कामगारांना सुरक्षा पुरवण्यासाठी, त्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि कार्यस्थळाची स्थिती सुधारण्यासाठी तसेच निरोगी कामगाराच्या मदतीने देशाचा आर्थिक विकास साधण्यासाठी हे विधेयक तयार करण्यात आले आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी होणारे अपघात कमी होतील, कामगाराचे आरोग्य सुधारल्याने उत्पादन वाढेल आणि इतर तणावाचे प्रसंग निर्माण होणार नाहीत, अशी अपेक्षा गंगवार यांनी व्यक्त केली.

10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यांना या विधेयकात असलेल्या तरतुदी लागू होणार आहेत. खाण आणि गोदी या ठिकाणी मात्र नियमात काही बदल असून ते लागू होतील. प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनाही या विधेयकातल्या तरतुदींचा लाभ देण्यात येणार आहेत.

Exit mobile version