कोविड-19 आजार प्रतिबंधात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
Ekach Dheya
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड-19 विषयक परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन, नीती आयोगाचे सदस्य, कॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधानांनी देशातील विविध भागातल्या कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीची आणि सर्व राज्यांच्या सज्जतेची माहिती घेतली. सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक शिस्त पाळण्याबाबत वारंवार सांगितले जावे, असे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले. कोविड बाबतची माहिती आणि जागृती व्यापक स्तरावर केली जावी आणि संक्रमण पसरणार नाही, यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत असेही पंतप्रधान म्हणाले. या विषयात आपल्याला दीर्घकाळ लढायचे असून कुठेही थांबायचा विचार करायलाही जागा नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी देशातील विविध राज्यात कोविडची परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेतला. सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक शिस्त याचे पालन करण्याबाबत लोकांशी वारंवार बोलायला हवे असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. कोविड संदर्भातील सर्व माहिती प्रसारित करायला हवी आणि हे संक्रमण अधिक पसरणार नाही, याची काळजी घ्यावी, असे पंतप्रधान म्हणाले.
कोविड-19 च्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी दिल्लीत, केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. दिल्ली लगतच्या NCR भागात कोविडचे व्यवस्थापन करण्यासाठी देखील हाच दृष्टीकोन असावा, असे पंतप्रधान म्हणाले.
अहमदाबाद येथे ‘धन्वंतरी रथा’च्या माध्यमातून निरीक्षण आणि घरात राहून घ्यावयाची काळजी, या यशस्वी उपक्रमाची चर्चा या बैठकीत करण्यात आली आणि इतर ठिकाणीही हा उपक्रम राबवण्याचे सांगण्यात आले. सर्व राज्यात, जिथे जिथे कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत, त्यांना मार्गदर्शन आणि रियल टाईम देखरेख करण्याची व्यवस्था केली जावी, असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.