स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नगरपालिकांचा गौरव
मुंबई : लोकसहभाग व सवयी बदलल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये परिवर्तन घडले आणि महाराष्ट्राने देशात सर्वाधिक पुरस्कार मिळविले आहेत. सन2020 च्या स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातील200 शहरे ‘थ्री स्टार’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच जी शहरे थ्री स्टार होतील, त्या शहरांना विविध योजनांसाठी निधी वितरणात प्राधान्य देण्यात येईल. तसेच सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना 500 कोटी रुपयांची पारितोषिके देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
स्वच्छ सर्वेक्षण 2018 व 2019 मध्ये देशपातळीवर सर्वोत्तम कामगिरी केलेल्या महानगरपालिका व नगरपालिकांचा गौरव समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज एनसीपीएच्या सभागृहात झाला. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर,नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर,नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नगर प्रशासन संचालक एम. शंकरनारायण आदी यावेळी उपस्थित होते. सन 2018 व 2019 च्या’स्वच्छ सर्वेक्षण’ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या राज्यातील 39 स्थानिक स्वराज्य संस्थांचा गौरव यावेळी करण्यात आला. नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी हा गौरव स्वीकारला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. महाराष्ट्राने यात पुढाकार घेऊन नागरी भागात सर्व नगरपालिकांना सोबत घेऊन स्वच्छतेची मोहीम सुरू केली. रेकॉर्डब्रेक काळात नागरी भाग हागणदारीमुक्त केला.2017 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याचे राष्ट्रपती महोदयांनी जाहीर केले. राज्याने स्वच्छतेबरोबरच घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन यावर भर दिला. घनकचरा व्यवस्थापनमध्ये हरित कंपोस्ट खत हा ब्रँड तयार केला. वेस्ट पासून वेल्थची सुरुवात नगरपालिकांनी केली. 2014 पूर्वी एकही शहर हागणदारीमुक्त नव्हते. मात्र गेल्या चार वर्षात सर्व शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत.
गेल्या पाच वर्षात नगरविकास विभागाला पूर्वीपेक्षा चार ते पाच पट जास्त निधी देण्यात येत आहे. नागरी संस्थांना विकास कामांसाठी हा निधी देण्यात येत आहे. नागरीकरण हे आव्हान नसून एक संधी मानून निर्णय घेतले. त्यातून शहराचे चित्र बदलू शकले. मोठ्या प्रमाणात विकास आराखडे तयार केले. या आराखड्याचा संबंध विकासाशी जोडला. विविध योजनेतून कामे केली. प्रधानमंत्री आवास योजनेतून नागरी भागात देशात सर्वाधिक घरे ही महाराष्ट्रमध्ये तयार झाली आहेत. अतिक्रमणाच्या ठिकाणी मालकी हक्काचे पट्टे दिले. त्यामुळे नगरपालिका बेघरमुक्त झाल्या. पिण्याच्या पाण्याच्या योजनांना निधी दिला. पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन यावर भर दिला, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. फडणवीस म्हणाले, नगरपालिका आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण 2018 व 2019 मध्ये सर्वाधिक पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. लोकांच्या सवयी बदलेपर्यंत परिवर्तन होऊ शकणार नाही. लोकांचा सहभाग व सवयी बदलल्या तर खऱ्या अर्थाने स्वच्छता निर्माण होईल. गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात देशात 53 शहरांना थ्री स्टार मिळाले आहेत. त्यापैकी 27 शहरे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. आतापर्यंत स्वच्छ सर्वेक्षणात मागे असलेल्या परंतु सन 2020 मध्ये सर्वेक्षणाच्या मानांकनात मोठी मजल (हायेस्ट जंप) मारणाऱ्या शहरांनाही मोठ्या प्रमाणात पुरस्कार देण्यात येतील. स्वच्छ भारत अभियानात राज्यातील नागरी भाग हा क्रांतीकारी कार्य करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्रीमती म्हैसकर म्हणाल्या, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले मार्गदर्शन आणि नागरिकांच्या सहभागामुळे स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र देशात सर्वोत्तम ठरले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये देशातील46 पैकी 10 शहरे राज्यातील होती तर अमृत शहरांच्या पहिल्या शंभरामध्ये राज्यातील 28 शहरे होती. तर स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये 193पुरस्कारांपैकी 46 पुरस्कार एकट्या महाराष्ट्राला आहेत. तसेच थ्री स्टार शहरांच्या मानांकनात 53 शहरापैकी 27शहरे राज्यातील आहेत. सन 2020मध्ये राज्यातील सर्वच शहरे थ्री स्टार करण्याचा निर्धार आहे.
यावेळी ‘क्रॅकिंग ऑफ कोड एस एस 18 and 19′ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी नगरविकास विभागाने संयुक्त राष्ट्र संघ विकास कार्यक्रम (यूएनडीपी), बिल अँड मेलिंडा गेट फाउंडेशन आणि जर्मन इंटरनॅशनल कॉर्पोरेशन यांच्याबरोबर विविध सामंजस्य करार केले. हरित कंपोस्ट खताच्या प्रसारासाठी तयार केलेल्या हरित ॲपचे अनावरण यावेळी करण्यात आले.