पुणे व्यापारी महासंघ लॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार
Ekach Dheya
व्यापारी महासंघासोबतच्या बैठकीत सविस्तर चर्चा
पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत पुणे व्यापारी महासंघाने दर्शविलेल्या विरोधाबाबत महासंघाच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून चर्चेवेळी पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनबाबत शासनास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, मितेश घटटे, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया आदी उपस्थित होते.
विशेष कार्य अधिकारी सौरभ राव म्हणाले, व्यापारी, दुकानदार हे अर्थ्व्यवस्थेचे मुलभूत स्त्रोत आहेत, परंतू दुकानात होणा-या गर्दीमुळे तसेच सुरक्षित अंतर पाळले जात नाही, मास्कचा वापरही दिसत नाही, यामुळे कोरानाबाधितांची संख्या वाढते आहे. कोणत्याही व्देषभावनेतून व्यापारी बांधवांवर कारवाई करण्यात येत नसून पुणे शहर व जिल्हयाला कोरोना संकटातून वाचविण्यासाठी व कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. पुणे व्यापारी महासंघाची कायम सहकार्याची भूमिका राहीली आहे, यापुढेही आपण कोरोनाच्या उच्चाटनासाठी मिळून काम करू व नक्कीच कोरोनाचे समूळ उच्चाटनासाठी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, पुणे व्यापारी महासंघाने कायम शासनाला सहकार्य केले आहे. लॉकडाऊनबाबतही सहकार्य अपेक्षित आहे. व्यापारी महासंघाच्या अडचणीबाबत प्रशासनाचीही कायम सहकार्याची भूमिका राहीली आहे, यापुढेही कायम सहकार्याची भूमिका राहील, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोरोनाचा संसर्ग व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो आहे. दुकानासमोर वस्तू खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी थांबविण्यासाठी लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्यामुळे पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त् श्रावण हर्डीकर म्हणाले, लॉकडाऊनची आपण सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया यांनी पुणे शहरात व्यापारी वर्गावर 10 लाख लोकांचा रोजगार अवलंबून आहे, लॉकडाऊनमुळे व्यापा-यांना आर्थिक अडचणी येत आहेत. व्यापारी वर्गाच्या अडचणी समजावून घेत त्यावर उपाययोजना करा, आम्ही शासनास सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना संसर्गचा वाढता धोका विचारात घेत पहिल्या पाच दिवसानंतर पुढील पाच दिवसासाठी लॉकडाऊनमध्ये काय शिथिलता आणता येईल याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.