मुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन कल्पनांनी युक्त बाजारपेठेचा विकास करणे आणि उत्पादनांची विक्री वाढविणे यासाठी उद्योजकांनी एकत्र येण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस आयटीसी ग्रँड सेंटर येथे विविध उद्योगांच्या सहकार्याने आयोजित ‘मार्केटिंग इनोव्हेशन समिट’ कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात ‘स्मार्ट कॉटन’ या उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण आणि ई-गव्हर्नन्स या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
या चर्चासत्रामध्ये कापड उद्योगावर विशेष चर्चा करण्यात आली. कापड उद्योगाच्या वाढीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात कापसाची मोठी बाजारपेठ असून, राज्य कापूस उत्पादनात देशात अग्रेसर आहे. नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करुन आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कापड उद्योगाचा आणखी विकास करता येणे शक्य आहे. नवीन तंत्रज्ञानासोबत बाजारपेठेतील विक्री व्यवस्था आणि पद्धतीही बदलत आहेत. कापड आणि कृषी उद्योग यांनी खासगी क्षेत्रासोबतच शासनाचेही सहकार्य घेणे गरजेचे आहे.
या चर्चासत्रात कृषी व वस्त्रोद्योग व्यवसायाची बाजारपेठ टिकवून ठेवण्याच्या विविध पैलूंवर विचारमंथन करण्यात आले.
या कार्यक्रमास वस्त्रोद्योग व पणनमंत्री प्रा.राम शिंदे, सचिव राजगोपाल देवरा, एमएससीसीजीएम फेडरेशनचे सचिव नवीन सोना आदी मान्यवर उपस्थित होते.