मुंबई : राज्यात पहिल्यांदाच विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याना परदेश शिक्षणाची संधी मिळणार आहे. राज्य शासनामार्फत या प्रवर्गातील दहा विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यावर्षी पाच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली असून या शिष्यवृत्तीसाठी येत्या 29 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय या कार्यालयात अर्ज करावेत असे आवाहन इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री डॉ. संजय कुटे यांनी केले आहे.
मंत्रालयात पाच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाल्याचे पत्र व शासन निर्णय मंत्री श्री.कुटे यांच्या हस्ते पालकांच्या हाती सुपुर्द करण्यात आले. यावेळी विभागाचे प्रधान सचिव जे. पी गुप्ता, यांच्या सह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते. यावर्षी नाशिक जिल्ह्यातील रोहीत सोनजे, धुळे जिल्ह्यातील रोहित बिऱ्हाडे यांना अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील फिरोज गांधी यांना जर्मनीच्या विद्यापीठात, अमरावती जिल्ह्यातील निखिल जाधव यांना ऑस्ट्रेलियातील विद्यापीठात तर पुणे जिल्ह्यातील अंकुर खताळ या विद्यार्थ्याला आयर्लंड येथील विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे.
सामान्य परिस्थितील विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जागतिक दर्जाच्या विद्यापीठात प्रवेश मिळविला आहे. परदेशातील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष दूरध्वनीवरून संपर्क साधून या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे विशेष कौतुक डॉ. कुटे यांनी केले आहे.
विजाभज व विमाप्र व इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व पी. एच. डीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा आहे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत 200 रॅकींगच्या आत असावी. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकुण जागेपैकी 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत. अधिक माहिती साठी https://sjsa.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.