मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात झालेल्या पावसाने नदी नाल्यांना पूर आला. भारंबा गावाजवळील नाल्यामधून जात असताना कन्नड वन परिक्षेत्राच्या साळेगाव बीटचे वनरक्षक राहुल दामोधर जाधव (वय ३०) आणि जैतखेडा बीटचे अजय संतोष भोई (वय २५) हे दोन वनरक्षक वाहून गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राहुल जाधव यांच्या पत्नी श्रीमती मंगल राहुल जाधव यांना तसेच अजय भोई यांच्या पत्नी श्रीमती ऐश्वर्या अजय भोई यांना प्रत्येकी 4 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश कन्नड तहसीलदार यांच्या वतीने देण्यात आले.
ही घटना अत्यंत दुर्देवी असून या दोन्ही कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत. शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे अशी ग्वाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. या दोन्ही वनरक्षकांच्या कुटुंबियांना मदत करण्यासंदर्भात वन विभागाने जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कन्नड तहसीलदार यांच्या मार्फत मृत वनरक्षकांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत दिली आहे. यापूर्वी वन विभागाने या दोन्ही कुटुंबियांना तातडीने करावयाची सर्व मदत दिली होती.