नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक मानवकेंद्रीत हवा, तसंच गरिब आणि दुर्बलांचा विकास हाच कार्यक्रम असायला हवा, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ते काल रात्री भारत- अमेरिका व्यापार परिषदेच्या वतीनं आयोजित ,” इंडिआ आयडीयाज ” परिषदेत बोलत होते. व्यापार सुलभतेबरोबरच ”ईज ऑफ लिव्हिंग” म्हणजेच जीवन सुकर करण्यावरही लक्ष केंद्रीत करायला हवं, असं प्रधानमंत्री म्हणाले. अपार संधींची भूमी म्हणून भारत पुढे येत असून, गेल्या ६ वर्षात भारतानं अर्थव्यवस्था उदार केल्याचं ते म्हणाले. संरक्षण, अंतराळ, कृषी, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी, त्यांनी अमेरिकेला आवाहन केलं.
अमेरिकी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याची मोठी संधी असून, हवाई क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी ही आदर्श वेळ असल्याचं ते म्हणाले. कोरोना काळात एप्रिल ते जुलै दरम्यान, २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक भारताकडे वळल्याचं त्यांनी सांगितलं. भारतात राबवलेल्या आर्थिक सुधारणांमुळे, स्पर्धात्मकता, डिजिटलायझेशन आणि पारदर्शकता वाढली असं सांगून ते म्हणाले की कोरोनानंतर जागतिक परिस्थिती पुन्हा रुळावर आणण्यासाठी, भारत-अमेरिका सहकार्य आवश्यक आहे.
समृद्ध आणि सशक्त जगासाठी भारताचं योगदान जारी असून भारतात उदारता, संधी आणि पर्याय यांचा योग्य तो मेळ साधण्यात आल्याचंही ते म्हणाले. देशांतर्गत मजबूत आर्थिक क्षमतांमुळेच, जागतिक आर्थिक बळकटीकरण शक्य असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.