Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वाढदिवस साजरा करणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री सहायता निधीस देणगी द्या; आरोग्य तपासणी, रक्तदान, प्लाझ्मा दान शिबिरे आयोजित करा – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : ‘आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ हाताने देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत’, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

आपल्याला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहोत असेही ते म्हणाले. २७ जुलै या आपल्या वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लाऊ नये किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये असेही मुख्यमंत्री म्हणतात.

गेल्या ४ महिन्यांपासून राज्य सरकार नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहे आणि आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही, उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे,असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान ,प्लाझ्मा दान करावे असे आवाहन केले आहे.

Exit mobile version