Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कारगिल विजय दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून वीर सैनिकांना मन की बात मधून अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त वीर सैनिक आणि वीर मातांना अभिवादन केलं आहे. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशवासियांना संबोधित करत होते.

आजच्या दिवशी देशवासियांनी कारगिल विजयात हातभार लावलेल्या वीरांच्या कथा अनेकानेक लोकांपर्यंत पोहोचवाव्या. तसेच www.gallantryawards.gov.in या वेबसाइटवरुन देशाच्या पराक्रमी योद्ध्यांची माहिती घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

सैनिकांच्या मनोबलाचे खच्चीकरण होईल असे कुठलेही कृत्य न करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. देशहिताच्या विरोधात असलेल्या अनेक गोष्टी समाज माध्यमांवर पसरविल्या जात आहेत. या गोष्टी फॉरवर्ड करु नका. प्रत्येक नागरिकाने कुठलीही कृती करण्यापूर्वी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केलं.

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र कोरोनाचा कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही.

अनेक ठिकाणी तो वेगाने पसरत आहे. त्यामुळं सतर्क राहण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना केले आहे. पूर्वीइतकीच खबरदारी आजही घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे किंवा रुमालाने चेहरा झाकून घेणे, एकमेकांपासून किमान सहा फुटाचे अंतर राखणे, सतत हात स्वच्छ करणे, कोठेही न थुंकणे आणि आणि स्वच्छता राखणे ही हत्यारेच कोरोनापासून आपले रक्षण करू शकतील, असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्वच्छता आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो‌. रुग्णालयांमध्ये गर्दी वाढते, त्यामुळे आपण सर्वांनी स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे, आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करत रहावे, असेही ते म्हणाले.

आसाम, बिहार यासारख्या राज्यांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा सर्वजण मिळून सामना करत आहेत. या संकटाचा तडाखा बसलेल्या नागरिकांसोबत सर्व देश असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोरोनाच्या काळात देशाच्या विविध भागात होत असलेल्या नवनव्या उपक्रमांचं कौतुक त्यांनी यावेळी केलं. तसेच देशात उत्पादित होत असलेल्या उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. यावेळी विविध परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविलेल्या देशभरातल्या तरुणाईशी त्यांनी संवाद साधला. तसेच सुरिनामचे नवे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी यांचे अभिनंदन केले.

येत्या १ ऑगस्ट २०२० रोजी लोकमान्य टिळकांची शंभरावी पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळकांचे अवघे आयुष्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक आहे. आपल्या सर्वांना त्यांच्याकडून बरेच काही शिकता येईल, असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Exit mobile version