Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

■शासनस्तरावरील विषय मार्गी लावणार
■ स्थानिक प्रशासनाने आमदारांशी समन्वय ठेवून विकास कामे पूर्ण करावीत
■ विकास कामांच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही

पुणे : ‘कोरोना’चा सामना करताना, विकास कामांनाही गती द्यावी. सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या असलेल्या नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देत शासनस्तरावरील कामे तात्काळ मार्गी लावणार असल्याची ग्वाही आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

पुण्यातील वडगाव शेरी (नगररोड) भागातील रस्त्यांच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार सुनील टिंगरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी, अधीक्षक अभियंता विजय शिंदे तसेच वन व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

खराडी ते शिवणे नदीकाठच्या रस्त्यासह नगररोडवरील रस्त्यांच्या प्रलंबित कामांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. यावेळी ते म्हणाले, सार्वजनिक हित लक्षात घेऊन येथील रस्त्यांची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या कामाच्या अनुषंगाने प्रशासन स्तरावरील प्रश्न स्थानिक आमदार, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने सोडवावेत, असे आदेश त्यांनी दिले. वनविभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या जागांच्या मंजुरीसाठीचे प्रस्ताव शासनाला तातडीने सादर करावेत, त्यामुळे शासनस्तरावरील कामे लवकरच मार्गी लावता येतील, असे ते म्हणाले.

नगररोड भागातील उड्डाणपुलाच्या कामाबाबत स्थानिक आमदार व महापालिका आयुक्तांनी बैठक घेऊन तो विषय मार्गी लावावा, असे सांगून विकास कामांच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महापालिकेचे संबंधित विभाग, वन विभाग व अन्य संबंधित विभागांनी समन्वय साधून पाठपुरावा ठेवून रस्त्यांची विकासकामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आमदार सुनील टिंगरे यांनी वडगाव शेरी मतदार संघातील रस्त्यांच्या प्रलंबित कामांची माहिती दिली. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामांसाठी पाठपुरावा करु, असे सांगितले.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कामे पूर्ण होण्यात प्रशासकीयस्तरावर येणाऱ्या अडचणींची माहिती देऊन प्रलंबित कामे गतीने पूर्ण करुन घेऊ, असे सांगितले.

Exit mobile version