नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची चाचणी करणाऱ्या ३ उच्च क्षमता चाचणी केंद्रांचं आज उद्घाटन केलं. यातलं एक चाचणी केंद्र मुंबईतल्या राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत आहेत. इतर दोन केंद्र नोएडा आणि कोलकत्यात आहेत.
जानेवारीमध्ये कोरोनाची चाचणी करणारी एकच प्रयोगशाळा होती. आता ही संख्या तेराशेपेक्षा अधिक झाली आहे. सध्या दिवसाला ५ लाखापेक्षा जास्त चाचण्या होत आहेत. लवकरच ही संख्या १० लाखापेक्षा जास्त होईल, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
देशातल्या ग्रामीण भागातल्या वैद्यकीय सुविधा वाढविण्याच गरज प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच मास्क वापरणे, परस्परांपासून सुरक्षित अंतर ठेवणे यासारख्या गोष्टी अजूनही सुरूच ठेवण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा मानस असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं. राज्यात प्रत्येक गावात कोरोना दक्षता समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांना दिली. यामध्ये गावातल्या मान्यवरांचा समावेश केला जाणार आहे. गावकऱ्यांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, यावर ही समिती देखरेख ठेवणार आहे.
सप्टेंबरनंतरही राज्यांना सातत्याने एन ९५ मास्क आणि पीपीई किटचा पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुंबईतल्या चाचणी केंद्राविषयी राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. स्नेहा महाले यांनी अधिक माहिती दिली.