Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं पूर्वीइतकीच खबरदारी घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू झाले आहेत, याकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे लक्ष वेधले. मन की बात द्वारे ते देशवासियांशी संवाद साधत होते.

कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. अनेक ठिकाणी तो वेगाने पसरत आहे. त्यामुळं सतर्क राहण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना केले आहे. पूर्वीइतकीच खबरदारी आजही घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे किंवा रुमालाने चेहरा झाकून घेणे, एकमेकांपासून किमान सहा फुटाचे अंतर राखणे, सतत हात स्वच्छ करणे, कोठेही न थुंकणे आणि आणि स्वच्छता राखणे ही हत्यारेच कोरोनापासून आपले रक्षण करू शकतील, असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्वच्छता आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो‌. रुग्णालयांमध्ये गर्दी वाढते, त्यामुळे आपण सर्वांनी स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे, आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करत रहावे, असेही ते म्हणाले.

कोरोनाच्या काळात देशाच्या विविध भागात होत असलेल्या नवनव्या उपक्रमांचं कौतुक त्यांनी यावेळी केलं. तसेच देशात उत्पादित होत असलेल्या उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.

येत्या १ ऑगस्ट २०२० रोजी लोकमान्य टिळकांची शंभरावी पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळकांचे अवघे आयुष्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक आहे. आपल्या सर्वांना त्यांच्याकडून बरेच काही शिकता येईल, असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Exit mobile version