जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी ‘तिसऱ्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे’ आयोजन
Ekach Dheya
पुणे : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील टाळेबंदीमुळे असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले. त्यामुळे आता अनलॉक १.० व २.० अंतर्गत काही अटी व शर्तीच्या आधारे सुरु करण्यात आलेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. याबाबीचा विचार करता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्यावतीने नोकरीकरीता इच्छुक बेरोजगार युवक-युवतींसाठी ‘तिसऱ्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी एका परिपत्रकान्वये दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील नामांकित आस्थापना किंवा कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदाद्वारे मोठी सुवर्णसंधी देऊ केली आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यांतर्गत पुणे जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सर्वसाधारणपणे वेल्डर, पेंटर, फिटर, मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, मशिनिस्ट, शीटमेटल वर्कर, एमएमटीएम, मशीन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, ग्राईडर, टर्नर यासारखे आयटीआय ट्रेड व एनसीटीव्हीटी या सारख्या पदासाठी आवश्यक त्या तांत्रिक पात्रताधारक उमेदवारांसाठी एकूण 3 हजार 85 पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाद्वारे लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्त पदासाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ‘ऑनलाईन’ पध्दतीने नोंदवावे. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपन्यांची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी, जेणेकरुन कोरोनाच्या प्रादूभार्वामुळे शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे व संधीचा लाभ घेणे उद्योजक व उमेदवार या उभयतांना सहज शक्य होईल.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्ट द्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. तरी इच्छुक युवक-युवतींनी 4 ऑगस्ट २०२० रोजी पर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, तसेच या रोजगार मेळाव्यात केवळ ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार असल्याने ई-मेलद्वारे सादर केलेले अर्ज, विचारात घेतले जाणार नाहीत, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.