लॉकडाऊनमध्ये मृत्यूदर घटविण्यात यश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
Ekach Dheya
सोलापूर : लॉकडाऊनच्या कालावधीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मृत्यूदर घटविण्यात यश आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. सोलापूरचा मृत्यूदर काही दिवसापूर्वी सुमारे दहा टक्के होता. वाढविलेल्या चाचण्या आणि त्वरीत करण्यात आलेले उपचार यामुळे तो आता 5.5 टक्क्यावर आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 17 जुलै ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या कालावधीत टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात आले. 1 जुलै ते 27 जुलै या कालावधीत सुमारे 33 हजार 870 चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यातून 5 हजार 701 पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्या. लॉकडाऊन कालावधीत 12 हजार 146 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. या वाढलेल्या टेस्टमुळे उपचारासाठी आवश्यक असणारी आरोग्य व्यवस्थाही विकसित करण्यात आली. सध्या जिल्ह्यात कोविड केअर सेंटरमध्ये 4 हजार 664, डेटिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 3 हजार 499 आणि डेटिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 3 हजार 499 बेडची क्षमता विकसित करण्यात आली.
गंभीर रुग्णांवर नामवंत डॉक्टरांकडून उपचार करता यावे यासाठी टेलि-आयसीयु प्रणाली लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे गंभीर रुग्णांवर उपचारासाठी मुंबई, पुणे येथील डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या हायस्पीड डाटा लाईनची व्यवस्था करण्यात आली आहे, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विविध ठिकाणी उभारण्यात येणारी कोविड केअर सेंटर, हॉस्पिटलसाठी पदभरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण ३८२४ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
केटरिंग कॉलेजमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये योगासने, प्राणायाम, संगीत यांचाही उपचारासोबत वापर करण्यात आला. तिथे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. समुपदेशक नेमण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या कालावधीत सामाजिक संस्थांच्या मदतीने गरजूंना सुमारे 36 हजार फूड पाकिटांचे वितरण केले ,असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.
यावेळी श्री.शिंदे, श्री. शिवशंकर, श्री. पाटील, श्री. वायचळ यांनीही लॉकडाऊन काळात केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.