Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहिर झाला. या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी ९५ पूर्णांक ३० शतांश  टक्के इतकी आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा हा निकाल १८ पूर्णांक २० शतांश टक्क्यांनी जास्त आहे. नऊ विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून त्याची टक्केवारी ९८ पूर्णांक ७७ शतांश टक्के इतकी  आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा असून त्याची टक्केवारी ९२ टक्के आहे.

यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून त्यांची टक्केवारी ९६ पूर्णांक १९ शतांश टक्के इतकी आहे तर मुलांचा निकाल ९३ पूर्णांक ९० शतांश टक्के इतका आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२ पूर्णांक ७३ शतांश टक्के इतका आहे.

कोरोंना संसर्गामुळे यंदा भूगोल आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली कार्य शिक्षण विषयाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. या दोन विषयांना इतर विषयातील सरासरी गुण आणि लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक याचे सरासरीचे गुण देण्यात आले.

Exit mobile version