Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एक लाख शेतमजुरांना कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम- कृषी मंत्री दादाजी भुसे

पुणे : कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे  यांच्या संकल्पनेतून कौशल्‍यावर आधारित काम करणा-या एक लाख शेतमजुरांसाठी महत्त्वाकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्याच्या पीक पद्धतीमध्ये औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी, सूक्ष्म सिंचनाची देखभाल -दुरूस्ती, रोपवाटिकेतील कामे, नियंत्रित शेती, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी इ. सर्व कामे ही कौशल्यावर आधारित आहेत. याबाबत शेतमजुरांना कौशल्याधारित प्रशिक्षण दिल्यास कामाची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास निश्चित मदत होवून शेतकऱ्यांना सुध्दा मोठा फायदा होणार आहे. शेतमजुरांचे कौशल्य वाढविणे, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना, सुरक्षितता व आरोग्य संरक्षण, कार्यक्षम व्यावसायिक सेवांची शेतक-यांना उपलब्धता, पर्यावरणपूरक कृषि पद्धतीस प्रोत्साहन व गुणवत्तापूर्ण शेतमालाचे उत्पादन करण्यासाठी शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये १ लाख मजुरांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठरविले असून प्रत्यक्ष अंमलबजावणीस  सुरूवात करण्यात आलेली आहे. प्रशिक्षण घेतलेल्या शेतमजुरांना प्राशिक्षणाचे प्रमाणपत्र सुध्दा देण्यात येणार असून त्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल.

सद्यस्थितीमध्ये कापूस व मका या प्रमुख पिकासाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार असल्यामुळे ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणी करणाऱ्या मजुरांना फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने आयोजित करण्यात आलेला आहे. जेणेकरुन किटकनाशकांचा योग्य वापर होईल व मजुरांची सुरक्षितता जपली जाईल.

या प्रशिक्षणाबाबत संबंधित जिल्ह्यातील प्रकल्प संचालक, आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधून ग्रामीण भागातील शेतमजुरांनी नोंदणी करुन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक, आत्मा, कृषि आयुक्तालय यांनी केले आहे.

Exit mobile version