एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी खादीच्या रेशमी मास्कच्या गिफ्ट बॉक्सचे केले विमोचन
Ekach Dheya
नवी दिल्ली : तुम्ही आता तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना खास खादी सिल्क फेस मास्कचा आकर्षक गिफ्ट बॉक्स भेट देऊ शकता. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी काल खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) विकसित केलेल्या गिफ्ट बॉक्सचे विमोचन केले. या गिफ्ट बॉक्समध्ये वेगवेगळ्या रंग आणि डिझाईनचे हाताने बनवलेले चार रेशमी मास्क आहेत. गोल्डन एम्बॉस्ड प्रिंटिंगसह काळ्या रंगात सुंदररीत्या बनवलेल्या हॅण्डमेड पेपर बॉक्सचे वेष्टन या मास्कना आहे.
गडकरी यांनी या भेटवस्तूचे कौतुक केले. ते म्हणाले की, सण आणि उत्सव साजरे करताना भेट म्हणून देण्यासाठी ही योग्य वस्तू असून त्यातून सुरक्षितता देखील सुनिश्चित होईल. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या मास्क बनवण्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले . ते म्हणाले कि कोरोना महामारीच्या सर्वात कठीण काळात कारागिरांना यामुळे शाश्वत उदरनिर्वाह उपलब्ध झाला आहे.
रेशमी मास्कच्या या गिफ्ट बॉक्सची किंमत प्रति बॉक्स केवळ 500 रुपये आहे आणि ते आता दिल्ली एनसीआरमधील सर्व केव्हीआयसी दुकानात उपलब्ध आहेत .
केवीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना म्हणाले की, परदेशी बाजारपेठेत शिरकाव करणे ही गिफ्ट बॉक्स सुरु करण्यामागील कल्पना आहे . मोठ्या संख्येने भारतीय लोक सणांच्या काळात आपल्या प्रियजनांसाठी वाजवी किंमतीच्या भेट वस्तू शोधत असतात.
गिफ्ट बॉक्समध्ये एक प्रिंटेड रेशमी मास्क आणि आकर्षक रंगातले अन्य तीन मास्क असतील. हे ट्रिपल-लेयर्ड रेशमी मास्क त्वचेला-अनुकूल, धुण्यायोग्य, पुन्हा वापरण्यायोग्य आणि जैव-विघटनक्षम आहेत. रेशीम मास्कला तीन चुण्या आहेत आणि ऍडजस्टेबल इअर लूप आणि आकर्षक मणी देखील आहेत. यात 100% खादी सूती कापडाचे दोन आतील स्तर आहेत आणि रेशमी कापडाचा बाह्य स्तर आहे.