मुंबई : राज्य निवडणूक आयोगातर्फे दिल्या जाणाऱ्या पहिल्या लोकशाही पुरस्कारांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मुंबईत केली. उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या शनिवारी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, असे सहारिया यांनी सांगितले. मुंबईतील हॉटेल आयटीसी मराठामध्ये 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सन 2016 आणि 2017 या कालावधीत पार पडलेल्या नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतल्याबद्दल विविध संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी वेगवेगळ्या सहा गटात एकूण 14 पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
राज्यघटनेच्या 73 आणि 74 व्या दुरुस्तीनंतर 1994 साली राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली. या आयोगांकडे स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यांच्या निवडणुकांची जबाबदारी असते. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला 25 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत 2017 ते 19 या काळात एक विशेष सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना संबंधितांकडून विशेष महत्व दिले जात नाही असे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर देशाची लोकशाही बळकट करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्व मिळावे या दृष्टीने या संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना लोकशाही पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला. त्यानुसार पहिल्या लोकशाही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. स्वयं शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्व देणाऱ्या महात्मा गांधी यांना यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ही विशेष आदरांजली देण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी सांगितले.
गटनिहाय पुरस्कार विजेत्यांची नावे अशी:-
अनु.क्र | पुरस्कार कशा प्रित्यर्थ | पुरस्कार विजेत्यांची नावे |
1. | निवडणुकांमध्ये लोकसहभाग वाढविणे | माथेरान हॉटेल असोसिएशन |
मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ | ||
महिंद्रा आणि महिंद्रा उद्योग समूह | ||
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् | ||
मुंबई विद्यापीठ | ||
मुंबई, रिसोर्स ॲण्ड सपोट सेंटर फॉर डेव्हल्पमेंट | ||
संदीप भास्कर जाधव, सोलापूर. | ||
2. | निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडणे | डॉ. अभिनव देशमुख, तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचिरोली |
श्रीमती दया अर्जुन डोईफोडे, पोलिस हेड कॉन्सटेबल, कराड | ||
श्री. केशव व्यंकटराव नेटके, तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी, पैठण नगरपरिषद. | ||
3. | निवडणुकांसंदर्भात अभ्यास आणि प्रत्यक्ष संशोधनाद्वारे ज्ञाननिर्मिती | गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे. |
4. | निवडणूक प्रक्रियेत संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर | माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन |
5. | निवडणुकांमध्ये मतदानाचे सर्वाधिक प्रमाण वाढवणे | बृहन्मुंबई महानगरपालिका |
6. | निवडणुका सुरळीत पार पाडणे, निवडणूक प्रक्रियेत संगणकाचा वापर करणे आणि मतदानाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ | श्री. ए. एस. आर. नायक, तत्कालीन जिल्हाधिकारी, गडचिरोली.
|