Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना साहित्यात स्थान, समाजात मान आणि व्यवहारात न्याय मिळवून देणारे अण्णाभाऊ थोर समाजसुधारक होते.  लोककला, लोकसाहित्य, लोकजीवन, पुरोगामी, सुधारणावादी विचारांचे ते स्वतंत्र विद्यापीठ होते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी देशासाठी, समाजासाठी  दिलेल्या योगदानामुळे ते सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महान साहित्यिक होते. मानवतावादी लेखक होते. दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव त्यांनी साहित्यातून मांडलं. उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊंनी जीवनभर मानवतावादाचा, शोषणमुक्तीचा लढा लढला. देशाचा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, गोवामुक्तीचा संग्राम, सामाजिक विषमतेविरुद्धची लढाई अशा अनेक संघर्षात आघाडीवर राहून भूमिका बजावली. राज्यात वैचारिक, सामाजिक, साहित्यिक क्रांती घडवण्याचं मोठं श्रेय लोकशाहीर अण्णाभाऊंना असल्याचं सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

Exit mobile version