स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या ग्रँड फिनालेला पंतप्रधानांनी केले संबोधित
परिवर्तनात्मक सुधारणा हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट, रोजगार मिळवणारे निर्माण करण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे घडवण्यावर भर- पंतप्रधान
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या ग्रँड फिनालेला व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे संबोधित केले.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन
देशासमोरच्या आव्हानांवर अनेक तोडगे काढण्यासाठी विद्यार्थी काम करत असल्याचे पंतप्रधानांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या ग्रँड फिनालेला संबोधित करताना सांगितले. समस्यांवर उपाय पुरवण्याबरोबरच डाटा, डीजीटायझेशन आणि हाय टेक भविष्य याबाबत भारताच्या आकांक्षाही ते मजबूत करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 21 व्या शतकाची जलद गती जाणून घेत प्र्भावी भूमिका बजावणे सुरूच ठेवण्यासाठी भारताने स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नवोन्मेश, संशोधन, विकास आणि उद्योजकता यासाठी आवश्यक परीरचना देशात उभारण्यात येत असल्याचे ते म्हणाले. भारताचे शिक्षण अधिक आधुनिक करणे आणि नैपुण्याला अधिक संधी निर्माण करणे हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
21 व्या शतकातल्या युवकांचे विचार, आशा आणि आकांक्षा लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिकधोरण आखण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. हा केवळ धोरण दस्तावेज नाही तर 130 कोटी पेक्षा जास्त भारतीयांच्या आकांक्षाचे प्रतिबिंब यात आहे. अगदी आजही अनेक मुलांची अशी भावना आहे की आपल्याला ज्या विषयात रुची नाही अशा विषयावर आधारित आपले मूल्यमापन केले जाते. पालक, नातेवाईक, मित्र इत्यादींच्या दबावामुळे, इतरांनी निवडलेल्या विषयांचा मुलांना स्वीकार करणे भाग पडते. यामुळे जनतेतला मोठा वर्ग, जो उत्तम शिक्षित आहे मात्र त्यांनी जे वाचन केले आहे त्यातले बरेचसे त्यांच्या उपयोगाचे नाही. नवे शैक्षणिक धोरण या दृष्टीकोनात बदल घडवणारे आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.भारतीय शिक्षण प्रणालीत सुसूत्र सुधारणा आणि शिक्षणाचा हेतू आणि आशय अशा दोन्हीतही परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करत हे साध्य करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ अनुभव फलदायी, विस्तारित आणि नैसर्गिक आवडीला पूरक ठरावा यासाठी नवे धोरण शिक्षण , संशोधन आणि नवोन्मेश यांच्यावर लक्ष केंद्रित करणारेआहे.
हे हॅकेथॉन म्हणजे तुम्ही समस्या सोडवण्याचा केलेला पहिला प्रयत्न नव्हे आणि शेवटचाही नव्हे. युवकांनी शिकणे,प्रश्न विचारणे आणि ते सोडवणे या तीन बाबी सुरूच ठेवल्या पाहिजेत असे ते म्हणाले. एखादी व्यक्ती शिकते तेव्हा प्रश्न विचारण्याची बुद्धी त्याच्याकडे येते, याचेच प्रतिबिंब भारताच्या राष्ट्रीयशैक्षणिक धोरणात असल्याचे त्यांनी सांगितले. जे शाळेनंतर रहात नाही,अशा दप्तराच्या ओझ्या, वरचे लक्ष आता शिक्षणाच्या वरदानाकडे वळवण्यात येत आहे,असे पंतप्रधान म्हणाले.
आंतरशाखीय विषयांच्या अभ्यासावर भर
नवीन शैक्षणिक धोरणाच्या महत्वपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक विशेष म्हणजे आता विद्यार्थी वर्गाला आंतरशाखीय विषयांचा अभ्सास करता येणार आहे. कारण कोणत्याही एका मापामध्ये सर्वांनाच बसवता येत नाही, याचा विचार करून धोरण निश्चित करताना मुलांना आपल्याला नेमका कोणत्या विषयात विशेष गोडी वाटते, याचा विचार करता येणार आहे आणि आपल्या आवडीच्या विषयात अधिक शिक्षण घेता येणार आहे. समाजाला किंवा इतरांना काय वाटते, ते त्याने शिकू नये, त्याऐवजी त्या विद्यार्थ्याला कोणत्या शाखेचे शिक्षण घ्यायचे आहे, ते घेता येणार आहे.
शिक्षणामध्ये प्रवेश, शिक्षणाची उपलब्धता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण सर्वांना उपलब्ध असले पाहिजे, या वचनाचे उद्धरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, प्रस्तुत शैक्षणिक धोरण हे डॉ. आंबेडकर यांच्या शिक्षण प्रवेशासंबंधीच्या, शिक्षण उपलब्धतेच्या संकल्पनेला समर्पित आहे. प्राथमिक शिक्षणापासून प्रारंभ होत असलेले शिक्षण, प्रवेशासाठी सर्वांना उपलब्ध असणार आहे. या धोरणाचे ध्येय सन 2035 पर्यंत देशात उच्च शिक्षणासाठी एकूण पटनोंदणीच्या प्रमाणामध्ये 50 टक्के वाढ व्हावी, असे निश्चित करण्यात आले आहे. या शैक्षणिक धोरणाचा हेतूच मुळात विद्यार्थी वर्गाने नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्मिती करण्यावर भर देवून नोकरी देणारे बनावे, असा आहे. याचाच अर्थ एक प्रकारे आपल्या मानसिकतेमध्ये आणि आपल्या दृष्टिकोनामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न आहे.
स्थानिक भाषेवर भर
पंतप्रधान म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारतीय भाषांची प्रगती होण्यास आणि पुढे विकसित होण्यास मदत होईल. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळात स्वतःच्या भाषेत शिकल्याचा लाभ होईल. नवीन शैक्षणिक धोरणामुळे संपन्न भारतीय भाषांची जगाला ओळख होईल, असे ते पुढे म्हणाले.
जागतिक एकात्मतेवर भर
पंतप्रधान म्हणाले, धोरणात स्थानिकवर लक्ष केंद्रीत केले आहे, त्याचवेळी जागतिक एकात्मेवरही भर देण्यात आला आहे. शीर्ष जागतिक संस्थांना भारतात आपल्या शाखा सुरु करण्यास प्रवृत्त करण्यात येईल. यामुळे भारतीय युवकांना जागतिक दर्जाचे प्रदर्शन करता येईल आणि विविध संधी उपलब्ध होतील, तसेच त्यांना जागतिक स्पर्धेशी मुकाबला करण्याची तयारी करता येईल. यामुळे भारतात जागतिक स्तरावरील संस्था निर्माण करण्यास आणि भारताला जागतिक शिक्षणाचे केंद्र बनविण्यास मदत होईल.