बिहारमध्ये पूर परिस्थिती गंभीर; आसाममधील पूर परिस्थितीत मात्र काहीशी सुधारणा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. गंडक, बुऱ्ही गंडक, बागमती, कमलाबालन, महानंदा आणि अध्वरा या नद्यांच्या धोक्याच्या पातळीवरून वाहात असून पुराचं पाणी अनेक वस्त्यांमध्ये शिरलं आहे. दरभंगा आणि समस्तीपुर जिल्ह्यांना धोक्याची सुचना देण्यात आली असून आत्तापर्यंत 14 जिल्ह्यातील 50 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे.
गोपालगंज, मधुबनी, सीतामढी आणि पश्चिम चम्पारण भागात परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून गेल्या 24 तासात 36 लोकांनी पुरात आपले प्राण गमावले आहेत. दरभंगा–समस्तीपुर आणि मुझफ्फरपुर – चाप्रा दरम्यानची रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बल आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन बलाची 29 पथकं मदत आणि पुनर्वसन कार्य करीत आहेत. चार लाख लोकांना आत्तापर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागान वर्तवला आहे.
आसाममधील पूर परिस्थितीत मात्र हळूहळू सुधारणा होत आहे. गेल्या 36 तासात इथं पाऊस झाला नाही. मात्र, पुरानं जनजीवन पुरत विस्कळीत झालं असून 20 जिल्ह्यातील 10 लाखांहून अधिक लोकांना त्याचा फटका बसला आहे. 29 हजार लोक अद्याप मदत छावण्यांमध्ये रहात आहेत.
109 जणांना पुरात आपले प्राण गमवावे लागले. मदत छावण्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या लोकांना तांदूळ, डाळी आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात येत आहे. काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यातील परिस्थितीही सुधारली असून 170 प्राण्यांना वाचविण्यात वन अधिकाऱ्यांना यश मिळालं आहे.