Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्लास्टिक पिशवीला कापडी पिशवीचा सक्षम पर्याय – पर्यावरणमंत्री रामदास कदम

मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी कापडी पिशवी  ही  प्लास्टिक पिशवीला (कॅरी बॅग) सक्षम पर्याय ठरेल. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केली जाणारी ही कापडी पिशवी प्रत्येक घरात पर्यावरण रक्षणाचा संदेश उत्तमरित्या पोहोचवेल असा विश्वास पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला.

शासनाचा पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,  बृहन्मुंबई महानगरपालिका व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने सांताक्रुजच्या प्रभात कॉलनीतील  महानगरपालिकेच्या मराठी शाळेत शालेय विद्यार्थ्यांना विनामूल्य कापडी पिशवी वितरण शुभारंभ सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व शालेय विद्यार्थ्यांना तीन लाख कापडी पिशव्यांचे विनामूल्य वितरण करण्यात येणार आहे.

बदलत्या पर्यावरणाचे धडे विद्यार्थ्यांना शालेय पातळीवर पर्यावरण शिक्षणातून देण्याची गरज निर्माण झाली आहे असे प्रतिपादन युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांवर पर्यावरण रक्षणाचे व संर्वधनाचे संस्कार केल्यास भविष्यात सुयोग्य पर्यावरण निश्चित निर्माण होईल त्यासाठी वर्तमानातील पिढीसमोर कापडी पिशवीच्या माध्यमातून प्लास्टिक पिशवीला चांगला पर्याय उपलब्ध करून दिल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या पुढाकाराबद्दल आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिला आर्थिक विकास महामंडळाला विशेष आर्थिक अनुदान उपलब्ध करून दिले असून त्यातून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना एकूण दोन  टप्प्यात २२,९०,००० कापडी पिशव्यांचे विनामूल्य वितरण केले जाणार आहे. यातून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटातील महिलांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

या कार्याक्रमास महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आ. अनिल परब, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहाय्यक सचिव पुंडलिक मिराशे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version