परदेश शिष्यवृत्ती : ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या मागील व चालू वर्षीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार शैक्षणिक फी व निर्वाहभत्ता
Ekach Dheya
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
मुंबई : सन २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी कोरोनामुळे परदेशातून किंवा भारतातून ऑनलाईन शिक्षण घेत असतील तर त्यांनाही फेब्रुवारी २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत शैक्षणिक फी व निर्वाह भत्ता मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
समाज कल्याण आयुक्त पुणे यांना याबाबत राज्य शासन स्तरावरून आदेश पारित करण्यात आला असून, शैक्षणिक फी व निर्वाह भत्ता देण्याच्या या निर्णयास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयानुसार २०१९ – २० व त्याआधीच्या वर्षामध्ये परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड होऊन परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले व सध्या शिक्षण सुरू असलेले विद्यार्थी सद्यस्थितीत परदेशात राहून ऑनलाईन शिक्षण घेत असतील त्यांना फेब्रुवारी २०२० ते सप्टेंबर २०२० या सत्रासाठी अनुज्ञेय असलेली शैक्षणिक फी व निर्वाहभत्ता मंजूर करण्यात आला आहे.
तसेच २०१९ – २० मध्ये निवड झालेले परंतु सद्यस्थितीत भारतात राहून किंवा भारतात परत येऊन पहिल्या सत्रासाठी ऑनलाईन शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांना २०२० – २१च्या पहिल्या सहामाहिसाठी अनुज्ञेय असलेली शैक्षणिक फी मंजूर करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत जे विद्यार्थी भारतात परत येण्यास इच्छुक असतील त्यांना ते ज्या दिनांकास परत येतील तोपर्यंतचा निर्वाहभत्ता व येण्या-जाण्याचे नियमानुसार विमान प्रवास भाडे देखील देण्यात येणार असल्याचे या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान कोरोनाच्या काळात परदेश शिष्यवृत्तीचे लाभार्थी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळून त्यांना पाठबळ देण्याचा आमचा प्रयत्न असून, सप्टेंबर २०२० नंतर संबंधित विद्यापीठाशी चर्चा करून पुढील शैक्षणिक फी संबंधी निर्णय घेण्यात येईल असे श्री.धनंजय मुंडे यांनी सांगितले.