मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याबाबत सूचना निर्गमित
Ekach Dheya
प्रशासक, स्वातंत्र्य सैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवक किंवा सक्षम अधिकारी यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी संबंधित गावांमध्ये प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पण एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी एका गावात ध्वजारोहण करावे, इतर गावात स्वातंत्र्य सैनिक किंवा तंटामुक्ती समिती अध्यक्ष किंवा ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकारी यांनी नेमलेले सक्षम अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे जिल्हा परिषदांना सूचित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
ध्वजसंहितेनुसार ग्रामीण भागात सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. ज्या गावांमध्ये सरपंच कार्यरत आहेत तिथे स्वातंत्र्यदिनी नियमानुसार ध्वजारोहण होईल. पण ज्या ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या आहेत तिथे कोरोना संकटामुळे निवडणुका झालेल्या नाहीत. या ग्रामपंचायतींवर गावातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण याबाबत सध्या उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या अंतरिम आदेशाप्रमाणे अशा ग्रामपंचायतींवर प्राधान्याने शासकीय अधिकारी व नंतर आवश्यक तेथे कारणे देऊन योग्य व्यक्तीस प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित शासन निर्णयास स्थगिती दिली आहे. शासनाने प्रशासक नियुक्तीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. या निर्णयास स्थगिती देऊन हे अधिकार शासनाचे आहेत, असे आदेश देण्यात आले. या दोन्ही निर्णयाप्रमाणे शासनास मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर खाजगी योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड करणे शक्य होते. पण उच्च न्यायालयाचा अंतिम आदेश होत नाही तोपर्यंत खाजगी योग्य व्यक्तीची निवड करणे योग्य नाही असा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी मुंबई, औरंगाबाद व नागपूर खंडपीठांकडे याबाबत दाखल झालेल्या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालय येथील न्या. शिंदे साहेब यांच्या खंडपीठाकडे वर्ग केल्या आहेत. मागील आठवड्यात पावसामुळे सुनावणी होऊ शकली नाही. जोपर्यंत अंतिम सुनावणी होऊन निर्णय होत नाही तोपर्यंत शासकीय अधिकारीच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची कारवाई झालेली आहे. एका अधिकाऱ्यास त्यांचा मुख्य कार्यभार व ३ ते ४ ग्रामपंचायतींचा प्रशासकाचा कार्यभार याशिवाय कोरोनाची ड्युटी असे कार्यभार आहेत.
त्यामुळे स्वातंत्र्य दिनी या प्रशासकांनी ध्वजारोहणासाठी एका गावाची निवड करुन त्या ठिकाणी ध्वजारोहण करावे. त्यांच्या कार्यभारामधील उर्वरित गावांमध्ये स्वातंत्र्यसैनिक असतील व ध्वजारोहण करण्यासाठी त्यांची तब्येत उत्तम असेल तर त्यांना प्राधान्य राहील. अन्यथा तंटामुक्त समिती अध्यक्ष ध्वजारोहण करतील. हे पद रिक्त असल्यास ग्रामसेवक किंवा या तीनपैकी शक्य नसल्यास गटविकास अधिकारी यांनी एखाद्या शासकीय अधिकाऱ्याची ध्वजारोहणासाठी नियुक्ती करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या संकटकाळात यासंदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन झेंडावंदनाचा कार्यक्रम करावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केले आहे.