दंतवैद्यक पदवीच्या तसंच वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बीडीएस अर्थात, दंतवैद्यक पदवीच्या तसंच वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. बीडीएसच्या परीक्षा येत्या 17 तारखेला, तर वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या 25 तारखेला घ्यायचं महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठानं ठरवलं आहे.
परीक्षा केंद्रांमधे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जाऊन या परीक्षा द्यायला विरोध करणा-या जनहित याचिकेची सुनावणी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या नेतृत्वाखालच्या पिठानं आज केली. या परीक्षा पुढे ढकलण्याचे किंवा ऑनलाईन परीक्षा घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. मात्र या परीक्षांना काहिंचा विरोध आहे, तसाच काहिंचा पाठिंबाही आहे.
शिवाय सर्वोच्च न्यायालयातही अशा काही याचिका दाखल आहेत, याची नोंद या पिठानं घेतली. शेवटच्या क्षणी या परीक्षांना स्थगिती देणं हा या परीक्षेची तयारी केलेल्या आणि परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष जाण्याची तयारी असलेल्या विद्यार्थ्यांच्या हिताविरुद्ध ठरेल, असं न्यायालयानं सांगितलं.
या परीक्षा घेतल्या नाही तर विद्यार्थ्यांना पुढच्या पातळीवरचं शिक्षण घेता येणार नाही, तसंच कोणत्याही क्षेत्रात विशेषज्ञ म्हणून अर्हता मिळवता येणार नाही. याकडे महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापिठानं न्यायालयाचं लक्ष वेधलं.
याचिकाकर्ते डॉक्टर असून, ते परीक्षेसाठी प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जायला तयार नसतील, तर रुग्णांवर उपचार करायला कसे बाहेर पडतील, असा सवाल न्यायालयानं केला.