Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महिला बालकल्याण क्षेत्रातील महाराष्ट्राच्या कामांबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून प्रशंसोद्गार

केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य यातही उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे प्रशंसोद्गार केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी काढले.

श्रीमती इराणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेऊन महिला व बालकल्याण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्राच्या योजनांच्या बरोबरीने राज्याच्या यंत्रणेने ग्रामीण क्षेत्रासह नागरी भागात महिला व बालकल्याणातील कुपोषणमुक्ती आणि आरोग्याशी निगडित योजना आणखी सक्षमपणे राबवू असे सांगितले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कुपोषणमुक्ती आणि महिला आरोग्याच्या क्षेत्रात राज्यातील यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत. यामुळे कुपोषण मुक्तीसह बालमृत्यू दर कमी करण्यात यश आले आहे. केंद्राप्रमाणेच राज्याच्या यंत्रणेनेही नागरी भागात विशेषत्वाने काम करण्याची गरज आहे. नागरी भागात या योजना आणखी सक्षमपणे राबविल्यास आणखी प्रभावी कामगिरी नोंदविता येईल.’

श्रीमती इराणी म्हणाल्या, ‘महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. राज्यात कुपोषणमुक्ती, माता व बालआरोग्य यात उत्कृष्टपणे काम सुरू आहे. राज्यात या क्षेत्रात आस्थेवाईकपणे काम सुरू आहे. ‘माँ’ या पोषण अभियानातही महाराष्ट्र अव्वल राहील असा विश्वास वाटतो.

यावेळी स्मार्ट अंगणवाडी, माता-बाल लसीकरण, पोक्सो अंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया व कार्यवाही, बाल मृत्यूदर रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजना, जाणीव-जागृतीचे उपक्रम, प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी आधाराश्रमांची उभारणी आदी विषयांवर चर्चा झाली.

याप्रसंगी महिला व बालकल्याण विभागाचे केंद्रीय सचिव श्री. पवनार, प्रधान सचिव भूषण गगराणी, राज्याच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्त इंद्रा मालो, अजय खेरा आदी उपस्थित होते.

Exit mobile version